Monday 13 July 2015

भेट तुझी

भेट तुझी
येतात जुळुनी स्वर मनातले तुझ्या नि माझ्या भेटीने,
क्षितिजालाही येते भरती जेव्हा आमंत्रण तव नयनांचे मिळते.

तरतो जेव्हा हवेत गंध तुझा थरारुन उठते तन माझे,
जीव माझा होतो पिसा मन झेप घेते निल नभाकडे.

साद तुझी ऐकता रोषणाई मैफीलीतल्या सप्तसुरांची होते,
झळाळती ऋतुरंग सारे अंबर सारे गजलक्ष्मीपरी झुलते.

नजरभेट लोचनांची होता प्रतिबिंब बिल्वरी जाते कोरले,
सौदामिनी अवतरते नसांनसांत काळीज उगी धडधडते.

येता नाजुक हात हाती तुझा प्राणपाखरु पंख फैलावते,
भिनतो डंख प्रितीचा भुलीवाचुनही भान माझे हरपते.

अंतर संपता दोघांतले नंदनवन रोमांचांचे बहरते,
प्रकाशतात सहस्त्रसुर्य एकदम मावळते ग्रहण एकांतवासाचे.

                                                                 प्रसाद कर्पे 

No comments:

Post a Comment