भेट तुझी
येतात जुळुनी स्वर मनातले तुझ्या नि माझ्या भेटीने,
क्षितिजालाही येते भरती जेव्हा आमंत्रण तव नयनांचे मिळते.
येतात जुळुनी स्वर मनातले तुझ्या नि माझ्या भेटीने,
क्षितिजालाही येते भरती जेव्हा आमंत्रण तव नयनांचे मिळते.
तरतो जेव्हा हवेत गंध तुझा थरारुन उठते तन माझे,
जीव माझा होतो पिसा मन झेप घेते निल नभाकडे.
साद तुझी ऐकता रोषणाई मैफीलीतल्या सप्तसुरांची होते,
झळाळती ऋतुरंग सारे अंबर सारे गजलक्ष्मीपरी झुलते.
नजरभेट लोचनांची होता प्रतिबिंब बिल्वरी जाते कोरले,
सौदामिनी अवतरते नसांनसांत काळीज उगी धडधडते.
येता नाजुक हात हाती तुझा प्राणपाखरु पंख फैलावते,
भिनतो डंख प्रितीचा भुलीवाचुनही भान माझे हरपते.
अंतर संपता दोघांतले नंदनवन रोमांचांचे बहरते,
प्रकाशतात सहस्त्रसुर्य एकदम मावळते ग्रहण एकांतवासाचे.
प्रसाद कर्पे
विरहात तुझ्या
कुंदकळ्यांना वेलीवरच्या आज उशीर का बरे फुलायला,
ओंजळीतल्या पाकळ्यांना का आज रंग लाभला निराळा.
दरवळाया आज विसरला का निशीगंध सडा फुलांचा घालताना,
का थांबले मेघही आज बरसात जलधारांची करताना,
मिसळले रंग इंद्रधनुचे एकमेकांत का रंुजी आकाशाशी घालताना,
का कोकिळेचा सुर बिघडला साद तिच्या प्रियेला घालताना.
चुकतो का बरं ठोका ह्रदयाचा मालिका शब्दांची गुंफताना,
का जातात सुर सोडुनी साथ तालाची सरगम गीताची छेडताना.
असेच होते आजकाल सारखे विरह जीवघेणा तुझा साहताना,
विसरत जातो मी वाटही पायाखालची सामोरी तु नसताना.
प्रसाद कर्पे
नाते तुझे नि माझे
कुणास ठाउक कसे जडले नाते तुझे नि माझे,
बहरास आले नकळत दोघंामध्ये मैत्र जीवांचे.
जुळली लय तालाशी जन्मा आले मधुर गीत नवे,
उलगडले मग हळुच नाजुक कोडे जन्मजन्मांतरीचे.
संपले अंतर सारे अंकुरले दोघांत बंध हे रेशमाचे,
सुरवंटाचे झाले फुलपाखरु तोडुन पाश कोशांचे.
ओलांडुन बांध सारे भरास आले प्रवाह भावनांचे,
लुप्त सरस्वतीलाही लागले वेध प्रितीसंगमाचे.
हटले मळभ आकाशातले ग्रहण चंद्राचेही संपले,
पुर आला चांदण्याला फिटता जाळे परकेपणाचे.
पडली मोहीनी नजरांची बेधुंद झाली मनातली नक्षत्रे,
जुळता ता-या सतारीच्या झंकारले त्यातुन सुर नवे.
थांबले ऋतुचक्र सारे लाभले ठाव वसंतास इथले,
बेभान वा-यालाही कळले संपले आता उगा भिरभिरणे.
प्रसाद कर्पे
लागता चाहुलही तुझी
लागता चाहुलही तुझी घुमु लागतात पारवे तुझ्या विचारांचे,
रोम रोम येती बहरास दिसता चांदणे तुझ्या चेह-यावरचे.
हासता तु झळाळुनी आसमंत सारे विरुन जाते धुके विरहाचे,
तव प्रेमाच्या धुंदीने गळुनी जाते एकटेपण माझे सगळे.
नादावतो जीव तुझ्याचसाठी फुटतात स्वप्नांनाही तुझे धुमारे,
उमलून यावे वाटते पुन्हा पुन्हा नव्याने तुझ्याच सोबतीने.
भारला जातो मी कणाकणाने तुझ्या श्वासांच्या गंधाने,
टाकता मोहीनी तु रेशमी स्पर्शाची मोहुन जातो मी तिळातिळाने.
कातर हळव्या मनास माझ्या मिळतो दिलासा तुझ्या कुजबुजीने,
अभ्रकाच्या पापुद्र्यासमे मग निघतात सा-या मनोरथांची कुलुपे.
भेटीने तुझ्या मनातल्या आभाळास चढतात बिलोरी रंग तुझे सारे,
ओल्या रंगांच्या त्या थेंबांत वाटते रंगुन जावे आयुष्य हे माझे.
प्रसाद कर्पे
होशील का तु राधिका
होशील का तु राधिका माझी ऐकण्या सुर माझ्या बासरीतले,
होउन तरंग मनाच्या डोहावरचे जागवशील का भावविश्व माझे.
येउनी धवल स्वप्नांत माझ्या भरशील का रंग आपुल्या प्रेमाचे,
गाउनी गीत माझे रंगवशील का क्षण आयुष्याच्या मैफीलीतले.
होउन किनारा देशील का हात सावरण्या गलबत भावनांचे,
सावली होउन माझी राखशिल का पाठ माझ्याच वाटेने.
देउन प्रवेश मनात तुझ्या देशिल का राहण्या अंतरंग तुझे,
देउन साथ मला उतरवशील का मणामणांचे
ओझे मनावरचे .
होउन श्रावणसरी भरशील का रिकामे बांध माझ्या जाणीवांचे,
घालुनी फुंकर शहा-यांची सजवशील का रान मुक्त नेणीवांचे.
विझवशील का निखारा माझ्यातला शिंपडुन थेंब तुझ्या स्पर्शाचे,
अडकवुनी नजरांशी नजरा देशील का पिउ अमृत तुझ्या नयनांतले.
वेचुनी काडी काडी माझ्या इच्छांची विणशील का घरटे मनोरथांचे,
करशील का मुक्त सुरवंटाला उलगडुनी बंध कोशातल्या रेशमाचे.
प्रसाद कर्पे
No comments:
Post a Comment