Thursday 3 September 2015

पाहतो जेव्हा खिडकीत तुला मी

पाहतो जेव्हा खिडकीत तुला

पाहतो जेव्हा खिडकीत तुला मी वाढते श्वासांच्या पेक्षा निःश्वासांची संख्या,
अचानक वाटते ह्रदयाच्या ठोक्यांना लाभला संगीताचा बाज नवा.

लाजुन हासतेस जेव्हा तु वाटतो उधळला शुभ्र मोतीयांचा अनमोल खजिना,
वाढते तापमान शरीरातले जसा शिशिरातही येतो अनुभव ग्रीष्माचा.

अवतरतो अवचित वसंत जेव्हा माळतेस तु केसांत गजरा मोग-याचा,
मोकळ्या केसांत तुझिया मग अडकतो जीव माझा होउन पिसासारखा.

सावरतेस जेव्हा तु ओढणी तुझी उलगडत जातो भरदिवसाही चित्रपट स्वप्नांचा,
कृष्णधवल आयुष्यात माझ्या मग होतो आपसुक वर्षाव इंद्रधनुषी रंगांचा.

पाहतेस जेव्हा तु वळुनी माझ्याकडे जातो शिखरास मनोरथांचा धावा,
अंतरीच्या हाकांना तेव्हा वाटतो द्यावा प्रतिसाद तोडुनी रितीभातींच्या श्रृंखला.

गुंफतेस जेव्हा तु बोटांत बोटे उजळतात लाखो दिपज्योती मनातल्या,
नकळत गुंफला जातो मग स्पंदनांत माझ्या तुझिया स्पंदनांचा मेळा.

संकोचत जेव्हा तु टाकतेस गळ्यात माझ्या करकमलांच्या तुझिया माळा,
धुंदावुनी जातो तेव्हा मी वाटतो लिहावा इतिहास सारा पुन्हा एकदा.

                                                                               प्रसाद कर्पे 

No comments:

Post a Comment